Sunday, February 03, 2013

अनाथांची माई - सिंधुताई सपकाळ

 दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

माई - सिंधुताई सपकाळ

स्व:ताची दु:खे बाजूला ठेवून अनाथ मुलांचे आयुष्य फुलवणाऱ्या माई चे जीवन खूपच प्रेरणादायी आहे.

जेमतेम ४ थी पर्यंत शिक्षण..शाळेत खाऊचा डबा नसायचा, तेव्हा इतर मुलांनी  डब्यातले सांडलेले अन्न फुले गोळा करायचे निमित्त करून खाणे .... वयाच्या ९ व्या वर्षी लग्न तेही ३५ वर्षे वयाच्या माणसासोबत ...सासरी शिक्षणाचा तिरस्कार ..सासुरवास ..१८ वर्ष पर्यंत ३ मुलं ...गावात बायकांनी गोळा केलेल्या गाई- म्हशीच्या शेणाच्या लिलावात बायकांना हिस्सा मिळावा म्हणून  केलेला संघर्ष ..त्यातून गावातल्या एकाने केलेल्या बदनामीमुळे वयाच्या २० व्या वर्षी ९ महिन्याची गरोदर असताना नवऱ्याने हाकलून दिले.. गाईच्या गोठयात  दिलेला मुलीला जन्म ...त्यानंतर जन्मदात्या आईनेही पाठ फिरवली ...जगण्यासाठी मागितलेली भिक ... रेल्वेत तान्ह्या मुलीला घेऊन गाणी गाऊन भाकरीचे तुकडे मिळवणे ... उघड्यावर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून स्मशानात काढलेले दिवस ... पोटातल्या भुकेसाठी प्रेताच्या अंत्यसंस्कारासाठी ठेवलेल पीठ आणि तिथेच ठेवलेल्या मडक्यातलं पाणी कालवून चितेवरच्या निखार्‍यावर भाजलेल्या कडक भाकरी खाणे ..आत्महत्तेचाही पर्यत्न... आणि इतके सोसूनही त्यांनी अनाथ, भिक मागणाऱ्या मुलांना जवळ केले, त्यांना माया, प्रेम दिले ..त्यांच्यासाठी भिक मागितली ..त्यांचे शिक्षण केले, त्यांना जगण्याची प्रेरणा दिली.

जवळ जवळ १ हजार पेक्षा जास्त मुलांच्या त्या आई बनल्या. आपल्या पोटच्या मुलीची माया अनाथ मुलांच्या सांभाळण्यात मध्ये येऊ नये म्हणून पोटच्या मुलीला अनाथ आश्रमांत ठेवले.

आजही माई अनाथ मुलांसाठी झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'
    'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. ' या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले ', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. " वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते ", माई सांगतात.

माई म्हणतात , ‘‘जगण्यासाठी, सोसण्यासाठीच बाईचा जन्म आहे. नीती, माती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालते, तिथे थकून उपयोग नाही. भूतकाळच वर्तमानाची वाट दाखवतो. "

" मुलांशी बापाचे नाते भीतीशी असते, तर आईचे नाते वेदनेशी असते"

"वेदना पदरात घेते ती आई असते. आई कधी खचत नाही, दुसर्‍याचे दुःख पदरात घेतले तर स्वतःचे दुःख हलके होते" या अनुभवाने त्यां आयुष्य जगल्या आहेत. अनाथ मुलांच्या वेदना पदरात घेऊन त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी माई आजही झटत असतात .

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्रित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.



अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित   "मी सिंधुताई सपकाळ" हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट "मी वनवासी" (नवरंग प्रकाशन)  या आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे.

माईंना आतापर्यंत २५८ राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.
माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,


निखार्‍यावरी दुर्दैवाच्या,
पडली चिमणी पिलं,
कवटाळूनी हृदयासी त्यांना मी
आईचं प्रेम दिलं,
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,
चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी..

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुणे - ४१२ ३०७
फोन. न. : ०२०-२६९९९५४१, ९३२६५३५२२४

संदर्भ :

No comments: